Saturday, September 19, 2009
प्रेम म्हणजे...
वेड लागलेल्या मनाचा हा खेळ आहे सारा
नजरेला नजर मिळते, चेहरा हृदयात सामावतो
प्रेमात शहाणा माणूसही आपली बुद्धी गमावतो
रात्रंदिवस सतावत राहते मग तिचीच आठवण
तिच्या एका झलकेसाठी आतुर होते मन
तिच्याच विचारांमध्ये हरखून मरते तहानभूख
प्रेम कराणार्यांपासून दूर पळते सुख
उघड्या डोळ्यांनीही आपण स्वप्ने पाहू लागतो
तिच्याच स्मृतींना जवळ करून आपण राहू लागतो
यातून बाहेर पडायचं तर पडताही येतं नाही
तिला समोर घेउन सगळं सांगताही येतं नाही
तिच्याशिवाय आपले जीवनचक्र अडून पडते
हसत हसत नकळतंच आपले मन रडते
खुपकाही करून बसतो आपण प्रेमासाठी
तरीही तिचा नकार लिहिला जातो आपल्या माथी
हृदयाचे मग होऊन जातात शेकडो तुकडे
जीवनाचे सरळ रस्तेही होतात वेडे-वाकडे
प्रेमात वाट्याला येतो शेवटी प्रेमभंग
नकोसे वाटू लागतात सातही रंग
प्रेम म्हणजे आहे वाळवंटातले मृगजळ
प्रेम आहे खोल दरी जिचा दिसत नाही तळ
म्हणून कधी करू नये प्रेमाला जवळ
नाहीतर जीवनात येतेच दुःखांचे वादळ
नुकतेच कुठे...
नुकतीच कुठे स्थिरावली होती हवेतली धूळ
नुकताच कुठे टाकला होता सुटकेचा निश्वास
नुकताच कुठे लागला होता भविष्याचा ध्यास
नुकतेच कुठे आले होते होठांवरती हसू
नुकताच कुठे लागला होता आशेचा सुर्य दिसू
नुकतेच कुठे उभारले होते विश्व पुन्हा सगळे
नुकतेच कुठे बहरत होते ऋतू आगळे-वेगळे
नुकतेच कुठे मनाला वाटू लागले होते बरे
नुकतेच पुन्हा वाहू लागले सोसाट्याचे वारे
आता कळेल तुला...
आता कळेल तुला, की नातं तोडल्यावर कसं वाटतं
स्वप्नांवर सत्याचा दगड पडला, की ते कसे खळकन फुटून जातात
मनात वाहणार्या भावनांच्या नद्या कशा झटकन आटून जातात
अश्रूंचा पूर पापण्यांचा बांध तोडून कसा वाहतो
अशावेळी धीरही कसा आपली साथ सोडून जातो
जीवनभर वैफल्य का माथी लिहीलं जातं
आकांक्षांना पूर्ण होताना स्वप्नांतचं का पाहीलं जातं
भर पावसांतही मनं का जळत असतं
वेड्या आशेमगे मनं का पळत असतं
डोळ्यांत पाणी असलं तरी का मनात असतो अंगार
उध्वस्त, उधळत्या विचारांवर का मन होते स्वार
दुनियेभरची दुःखं झोळीत टाकून माणसं कशी होतात वेगळी
दैव कशी खेळतो भावनांशी खेळी
मनात खोलवर जाऊन कसा रुतून बसतो सल
आयुष्यभर कसा साचून राहतो आपल्याभोवती दुःखांचा चिखल
Monday, August 31, 2009
चार-आठ आणे वाचवायला वाद घालत होतो
इतक्यात एका ठेल्यापाशी "ती" मला दिसली
माझ्याकडे पाहून ती ओळख दाखवून हसली
लाल साडी, लाल पर्स, डोळ्यांवर काळा गॉगल
हीच नव्हे का ती कॉलेजमधली माझी "क्यूट गर्ल"!!
रोज लपून छपून आम्ही एकमेकांना पहायचो
मित्रांनी चिडवल्यावर मी चक्क लाजायचो
काहीतरी होईल अशी मला होती खात्री
नकार देईल ती अशी वाटायची पण भीती
कॉलेज पटकन संपले आणी तो प्रसंग टळला
स्वतःचे भविष्य घडवण्याकडे माझा मार्ग वळला
आणी आज अचानक ती पुन्हा माझ्यासमोर आली
अवघडल्यासारखं मी हसताच तिचीही खात्री झाली
"काय रे, कसा आहेस, कसं काय धंदापाणी??
ओळखलास ना मला, मी तर मैत्रीण जुनी...
कॉलेजमध्ये नाही का आपण कित्ती मजा करायचो
एकमेकांना कसं आपण लपूनछ्पून बघायचो..!!!
पण तू कसला भित्रा, मला बोलला नाहीस काही
तुला इंटरेस्ट नसेल म्हणून गप्प राहिले मीहि
परवा तुझा तो मित्र शाम भेटला होता
चौपाटीवर पठ्ठ्या बायकोला फिरवत होता
त्यानेच मला तुझा हा सर्व किस्सा सांगितला
मला तर हे सगळं ऐकून धक्का बसला
गप्प राहिलो नसतो तेव्हा तर बरं झालं असतं
कॉलेज संपल्याबरोबर आपण लग्न केलं असतं
पण अजूनही काही उशीर झाला नाही
तू असशील तयार, तर तयार आहे मीहि..."
अचानक बोलता बोलता ती पट्कन थांबली
माझ्या पाठच्या स्त्रीकडे पाहून परत बोलू लागली
"ही कोण बाई मघापासून इथे उभी आहे?
मी आल्यापासून मला खुन्नस देते आहे..."
मी काही बोलणार तोच स्त्री बोलू लागली "ती"
"तुम्हाला माहित नसेल, पण हे आहेत माझे पती!
तुम्ही असं अचानक भेटला ते बरं झालं,
नाहितर ह्यांच ’हे’ प्रकरण मला कधी कळलंच नसतं..
बरं होईल जर आता निघाल तुम्ही..."
घरी गेल्यावर खैर नाही, म्हणून काळजीत पडलो मी...
तुझ्या डोळ्यातलं स्वप्न हळूचं पहावसं वाटतं
तुझ्या डोळ्यांत अस्मानीच्या नक्षत्रांना बघावसं वाटतं
तुझ्या डोळ्यांत घर करून रहावसं वाटतं
तुझे डोळे पाहतील त्याच रस्त्यावरून जावसं वाटतं
तुझ्या डोळ्यांवर गीत करून ते गावसं वाटतं
तुझ्या डोळ्य़ांच्या एकाच कटाक्षाने घायाळ व्हावसं वाटतं
तुझ्या डोळ्यांवर तन-मन अर्पावसं वाटतं
तुझ्या डोळ्यांतलं तेज दश-दिशांना पसरवावसं वाटतं
तुझ्या डोळ्यांना शीतल चंद्रकिरणांनी सजवावसं वाटतं
तुझ्या डोळ्य़ांतल्या चंचल हास्याला धरावसं वाटतं
तुझे डोळे पाहून तुझ्यावर प्रेम करावंस वाटतं
प्रणयरात्र...
त्यानंतर वेगवेगळ्या वाटा,
अलग व्हायचंच आहे
जशा बहरतील पहाटेच्या छटा...
ही रात्रच हाताशी आहे
तेव्हा दवडू नकोस वेळ,
काहि क्षणांतच संपेल
हा अंधाराचा खेळ...
कोण जाणे उद्या कुठे तू
अन कुठे मी?
नशीब कुठवर नेईल
याची कोण देईल हमी!
तेव्हा हीच वेळ आहे
काहीतरी करूया खास,
आजचा हात धरू
सोडून "उद्या"चा ध्यास...
काहीतरी करूया
आठवणीत राहील असं,
काहीतरी करूया
कधी विसरणार नाही असं...
दे हात तुझा
माझ्या हातात हळुवार,
ये जरा मिठीत
वारा सुटलाय गार...
गोंजारू दे तुझे केस
उगाच चाळा लडिवाळ,
न्याहाळू दे तुझा चेहरा
करुन हातांची ओंजळ...
मिसळू दे माझ्या श्वासांमध्ये
उष्ण श्वास तुझे,
विरघळू दे गुलाबी आसमंतात
मंद उसासे तुझे...
सामावून जा माझ्या कवेत
अधरांवर ठेव अधर,
विसरून दुनीयेला साऱ्या
प्रेमाची बरसात कर...
पाहता पाहता सकाळ होईल
मग व्हायचं आहेच वेगळं,
तेव्हा कसं सोडून चालेल
हे क्षणभंगुर सुख सगळं?
उणीव जाणवेल तुझी
तुला सोडून गेल्यावर,
आठवण सतावेल माझी
मी निघून गेल्यावर...
फक्त डोळे बंद कर तेव्हा
ह्रुदयातून तुझ्या येईल आवाज माझा,
कारण सोडुन जरी गेलो तुला
ह्रुदयात तुझ्या असेल ठिकाणा माझा...
चुंबन...
एकमेकांच्या डोळ्यांमधली सुखस्वप्ने पाहत होते
उद्यानाच्या "त्या" जागी ते दोघे येऊन बसले
एकमेकांकडे पाहून अन मग उगाचच ते हसले
त्यांच्यासारख्याच प्रेमवीरांचा तिथे भरला होता दरबार
बाहुपाशांत गुंतले होते सारे... नव्हता जगाशी सरोकार
तिथेच थोडया अंतरावर एक जोडपे होते बसले
त्यांचे चुंबनदृश्य याच्या अधीर डोळ्यांना दिसले
ते पाहून कामदेवाचा बाण बसला याच्या वर्मी
क्षणांत वाढू लागली त्याच्या देहाची गरमी
तिचा चेहरा हलकेच त्याने आपल्या हातांत घेतला
थरथरता आपला ओठ त्याने तिच्या ओठांजवळ नेला
तिच्याही कायेत होती यौवनाची मस्ती
या क्षणी जणू संचारली तिच्या शरीराल रती
त्याच्या आमंत्रणाला तिनेही दिली तशीच दाद
अधरांवर त्याच्या अधर टेकवून दिला गोड प्रतिसाद
क्षणांत झाले दोन नरम, उष्ण ओठांचे मिलन
दहादिशांना झाली जणू सप्तरंगांची उधळण
पुन्हा पुन्हा घेत होता तो त्या कोमल पाकळ्यांची गोडी
तीही मग मागे राहणार होती थोडी?
पाच-दहा मिनिटे त्यांचा हा खेळ चालूच राहिला
गळ्यात गळा घालून आम्ही दोघांनीही तो पाहिला...
नेहमीचंच झालय आता...
जगण्य़ातलं सुख सोडून रोज रोज मरणं
नेहमीचंच झालय आता रात्र रात्र जागणं
कधीतरी एकटाच असताना वेड्यासारखं वागणं
नेहमीचंच झालय आता भावना मनात दाटणं
भावनांच्या पुरात वाहून दूरवर जाणं
नेहमीचंच झालय आता कुठेतरी झुरत बसणं
कोणी सोबत नसलं तरी आठवणींचं साथ असणं
नेहमीचंच झालय आता सर्व साहून गप्प बसणं
थोडा काळ गेला की "ति"ला सगळं सांगणं
नेहमीचंच झालय आता तिचं अवघडल्यासारखं हसणं
सगळं कळूनही काहीच कळतं नाही असं वागणं
नेहमीचंच झालय आता तिच "नाही" म्हणणं
आणि प्रेमात पडून स्वतःचंच हसं करून घेणं
प्रश्न कितीतरी...
प्रत्येक छोट्याशा सुखालाही माझं मन का मुकत??
की नियती फक्त माझ्याशीच खेळते हा क्रूर खॆळ??
कधीच होणार नाही का आमच्या दोन मनांचा मेळ??
नशीब नशीब म्हणतो तरी मी कमनशीबी का??
मनातल्या भावनांना मी मनातच कोंडायचे का??
मार्गात प्रत्येक पावलावर का टोचतात मला काटे??
मिळेल प्रेम कधीतरी असे का अनुदिन मज वाटे??
आशेच्या कुबड्या घेऊन आता कुठवर जगायचं??
जवळ येणार्या प्रेमाला कितीदा दूर जाताना बघायचं??
दुःखाच्या वाळवंटात येणार नाही का सुखाचा वसंत??
नेहमी कोराच राहणार का मनातला प्रेमग्रंथ??
रात्रभर जागणार्या डोळ्य़ांना मिळणार नाही का विश्रांती??
धडपडणार्या मनाला कधीच मिळणार नाही शांती??
कधीच थकणार नाही का मी मृगजळामागे पळून??
कधीच बघणार नाही का ती मझ्याकडे वळून??
प्रवासी...
एक प्रवासी चालतच होता मुसळधार पाऊसपाण्य़ातून
संकटांचे उत्तुंग पर्वत त्याला अडवू नाही शकले
मैलो न मैल चालूनही त्याचे पाय नव्हते थकले
निराशेचे काळॆ ढग त्याने दूर सारले
न्यूनगंडाच्या असुरांना जिद्दीने मारले
दुःखाचे मरुद्यान त्याने सहज पार केले
प्रेमाच्या सुखद झुळकेला त्याने स्वतःबरोबर नेले
लोभाच्या दलदलीत त्याचे पाय नाही रुतले
आशेच्या व्रुक्षांना त्याने खतपाणी घातले
चालतच होता तो जरी काटे त्याला टोचले
उभारी देतच होता मनाला जरी मन होते खचले
Friday, August 28, 2009
फक्त एकदा...
तुला बरंच काही सांगायचंय
मनात माझ्या जे दाटून आलंय
ते अजून तुला उमगायचंय...
फक्त एकदा जाणून बघ
माझ्यातला "मी" जो हरवलाय
दुनियादारीच्या जाळ्यामध्ये
आत्मा ज्याचा अडकून पडलाय...
फक्त एकदा विश्वास ठेऊन बघ
निष्ठा काय असते ते तुला दाखवायचंय
परकियांच्या या दुनियेमध्ये
आपलं म्हणून तुला वागवायचंय...
फक्त एकदा आपलं म्हणून बघ
तुलाच कवटाळून बसायचंय
तुझ्या दुःखात आसवं गाळून
सुखात तुझ्या हसायचंय...
फक्त एकदा प्रेम करून बघ
आयुष्य तुझ्यासाठीच खर्चायचंय
प्रेमाचा पाऊस बनून
तुझ्यावरती बरसायचंय...
आठवण...
ती नारळाची बने आणि बेभान वारा
आठवतात ती प्रेमाची गाणी
कोवळ्या शहाळ्याचे थंडगार पाणी
आठवतात त्या उसळणाऱ्या लाटा
ओहोटीनंतरच्या नागमोडी वाटा
आठवते हातात घालून तास न तास फिरणे
कंटाळा आल्यावर दगडांवर बसणे
आठवतात त्या दगडांपाठच्या घट्ट घट्ट मिठया
एकमेकांना चोरून लिहीलेल्या प्रेमाच्या चिठ्ठया
आठवते ती नरम गुलाबी ओठांची गोडी
दूरवर संथपणे जाणारी होडी
आठवतात ती नावं... ऒल्या वाळूत लिहीलेली
आणी ती संध्या तुझ्यासोबत पाहिलेली
आठवतेस मग तू... जिला सर्वस्व अर्पिले
ते सारे प्रेमबंध जिने क्षणात तोडून दिले...
मी आणि पाऊस...
मी आणि पाऊस तसे जुनेच सोबती
एकमेकांच्या सुख-दुःखांचे पुराणेच सांगाती
पाण्याचं नातं असूनही दोहोंत अतूट बंध आहे
खाऱ्या पाण्याशी आमचा दोघांचाही संबंध आहे
पण मी स्वार्थी... तो रडतो तेव्हा हसतो
आणि तो बिचारा... मी रडलो तरी रडतो
त्याच्या थेंबांत माझ्या चेहऱ्यावरचे मुखवटे विरघळून जातात
त्याच्या अश्रूंत मिसळून माझे अश्रू ओघळून जातात
कधी उगाचच तो मला विजेचा धाक दाखवतो
मित्र असला तरी कधी वैऱ्यासारखा वागवतो
पण मी ही तीतकाच पक्का आहे, हे येतं मला दाखवायला
थेंब त्याचे मिठीत पकडून येतं त्याला खिजवायला
पण तो कसला लबाड! तेव्हडयापुरता गप्प बसतो
नजर माझी जरा हटली तर वेडयासारखा बरसतो
माझ्यासारखंच रागावलेलं त्यालाही आवडत नाही
त्याच्यावर सारखं रागावणं मला परवडत नाही
नाहीतर आठ-आठ महिने तो दडी मारून बसतो
मला चिडवून ढगांच्या गालात खुदू-खुदू हसतो
त्याच्याविना हजार मुखवटयांत अडकून पडतात माझे श्वास
म्हणूनच पावसाळा संपताच असतो मला पावसाचा ध्यास
प्रेम नाही तुझ्यावर तरीही...
डोळे बंद केले तरी माझ्या स्वप्नांमध्ये तू असतेस
प्रेम नाही तुझ्यावर तरीही येतात सारखे तुझेच विचार
दिसलीस नाही कधी जर तू मन व्याकुळ होते फार
प्रेम नाही तुझ्यावर तरीही आवडतो तुझ सहवास
रात्रंदिनी,क्षणोक्षणी मनाला असतो तुझाच ध्यास
प्रेम नाही तुझ्यावर तरीही तुझ्याशी खूप बोलावसं वाटतं
हातात हात घेऊन तुझा मैलो न मैल चालावसं वाटतं
प्रेम नाही तुझ्यावर तरीही तुझं अल्लड हास्य कानात घुमतं
विसरून सगळ्या जगाला तुझ्या आठवाणीत मन रमतं
प्रेम नाही तुझ्यावर तरीही तूच आहेस मझ्या ह्रुदयात
पण मग लोकांना का वाटतं... की मी पडलोय तुझ्या प्रेमात...!!!
उत्थान...
कुठंवर जायचंय माहित नाही तरीही
छातीला पडलेल्या भगदाडातून रक्ताची धार लागलीय
आणि मेंदू कालवतेय माशांची भुणभुण
उच्छवासातून बाहेर पडतोय कर्बाचा वायू
श्वास घेतोय करपलेल्या चामडीचा दुर्गंध
पावलं पडताहेत दूरवरच्या त्या फसव्या मृगजळाकडे
दोन्ही बाजूला रान पेटलंय
उगाच चिमुकला पक्षी चोचीतून पाणी मारतोय ज्वाळेवर
स्वतःची कुवत माहित असूनही
वाटेवरच अंत यावा... तो आला तर बरंच
पण मुक्ती मिळेल तिथवर जाऊनच
तिथेच होईल आत्मा शुद्ध, जसा जन्माआधी होता
शरीर वाहून जाईल पापाच्या गर्तेत
अस्थी-चर्माच्या गाठोडयाची होईल भुरकट राख
फिनिक्ससारखा आत्मा करेल उड्डाण
स्वर्गाच्या वाटेवर... दोन पंख आणि तेज घेऊन
होइल बुभुक्षित मनाचं उत्थान...!!!
वृक्ष...
उभा रस्त्याच्या कडेला
पाने गळून गेली
खाली पाचोळा साचला
पोटात कोरडी ढोली
रावा उडून गेलेला
दूर दूर जाई पांथस्थ
जरी थकला-भागला
खोड करपलेले अन
पालवी गळून गेली
रणरणत्या उन्हात
मी शोधतो सावली
येता स्मृती गतकाळाची
मन भरून हे आले
हिरवी वस्त्रे अन स्मरले
फुलत्या रंगांचे सोहळे
रंग-गंध काळावर
स्वार होऊन ते गेले
ढलप्या आणि काटे
मागे संगतीला राहिले
नाही खंत जरी सूर्य
मला दाहात जाळतो
बनून सरपण
आनंद चूलीत जळतो
आठवणीतला पाऊस...
उधळत्या धुळीत मातीचा सुगंध मोकाट
थेंबांची उधळण... आली पावसाची वर्दी
आभाळात ढगांची अन मनात आठवणींची गर्दी
आठवणींच्या सरींमध्ये चिंब ओले झाले मन
झाले-गेले पावसाळे आले पुन्हा परतून
तू होतीस मजसंगे अशा किती पावसांत
किती थेंब झेलले मी तुझा हात घेऊन हातात
पसरून दोन्ही हात तुझे पावसाला झेलणे
डबक्यात एखाद्या निरागस तुझे खेळणे
काळ्या स्वच्छ रस्त्यांवरची वळणे ती ओलीचिंब
पसाभर पाण्यातले तुझे हसरे प्रतिबिंब
त्या ढगांहून काळे तुझ्या डोळ्यांतले काजळ
उष्ण-सुगंधी श्वासांमध्ये दडलेले ते वादळ
जोरदार पावसात जरा घेऊन आडोसा
सामावलीस मिठीत माझ्या... सावध... घेऊन कानोसा
त्या मिठीच्या उबेत सारे क्षण ते भिजलेले
घोंघावत्या वाऱ्यात सारे क्षण ते थिजलेले
हिरव्याशार गवतावरची वाऱ्याची मंद सळसळ
सारे क्षण साठवले करून मनाची ओंजळ
पावसाळ्यातल्या भेटी... कधीच विरून त्या गेल्या
मागे राहिल्या फक्त झुलत्या-गळत्या पागोळ्या
तुझ्यासोबतिचा पाऊस नाही कधीच आटला
आज तोच पाऊस माझ्या डोळ्यांत दाटला...
