Friday, August 28, 2009

वृक्ष...

आहे वृक्ष मी एक
उभा रस्त्याच्या कडेला
पाने गळून गेली
खाली पाचोळा साचला

पोटात कोरडी ढोली
रावा उडून गेलेला
दूर दूर जाई पांथस्थ
जरी थकला-भागला

खोड करपलेले अन
पालवी गळून गेली
रणरणत्या उन्हात
मी शोधतो सावली

येता स्मृती गतकाळाची
मन भरून हे आले
हिरवी वस्त्रे अन स्मरले
फुलत्या रंगांचे सोहळे

रंग-गंध काळावर
स्वार होऊन ते गेले
ढलप्या आणि काटे
मागे संगतीला राहिले


नाही खंत जरी सूर्य
मला दाहात जाळतो
बनून सरपण
आनंद चूलीत जळतो

No comments:

Post a Comment