Friday, August 28, 2009

मी आणि पाऊस...

मी आणि पाऊस तसे जुनेच सोबती
एकमेकांच्या सुख-दुःखांचे पुराणेच सांगाती

पाण्याचं नातं असूनही दोहोंत अतूट बंध आहे
खाऱ्या पाण्याशी आमचा दोघांचाही संबंध आहे

पण मी स्वार्थी... तो रडतो तेव्हा हसतो
आणि तो बिचारा... मी रडलो तरी रडतो

त्याच्या थेंबांत माझ्या चेहऱ्यावरचे मुखवटे विरघळून जातात
त्याच्या अश्रूंत मिसळून माझे अश्रू ओघळून जातात

कधी उगाचच तो मला विजेचा धाक दाखवतो
मित्र असला तरी कधी वैऱ्यासारखा वागवतो

पण मी ही तीतकाच पक्का आहे, हे येतं मला दाखवायला
थेंब त्याचे मिठीत पकडून येतं त्याला खिजवायला

पण तो कसला लबाड! तेव्हडयापुरता गप्प बसतो
नजर माझी जरा हटली तर वेडयासारखा बरसतो

माझ्यासारखंच रागावलेलं त्यालाही आवडत नाही
त्याच्यावर सारखं रागावणं मला परवडत नाही

नाहीतर आठ-आठ महिने तो दडी मारून बसतो
मला चिडवून ढगांच्या गालात खुदू-खुदू हसतो

त्याच्याविना हजार मुखवटयांत अडकून पडतात माझे श्वास
म्हणूनच पावसाळा संपताच असतो मला पावसाचा ध्यास

No comments:

Post a Comment