बाहेर अंधारून आलंय अन वारा वाहतोय सुसाट
उधळत्या धुळीत मातीचा सुगंध मोकाट
थेंबांची उधळण... आली पावसाची वर्दी
आभाळात ढगांची अन मनात आठवणींची गर्दी
आठवणींच्या सरींमध्ये चिंब ओले झाले मन
झाले-गेले पावसाळे आले पुन्हा परतून
तू होतीस मजसंगे अशा किती पावसांत
किती थेंब झेलले मी तुझा हात घेऊन हातात
पसरून दोन्ही हात तुझे पावसाला झेलणे
डबक्यात एखाद्या निरागस तुझे खेळणे
काळ्या स्वच्छ रस्त्यांवरची वळणे ती ओलीचिंब
पसाभर पाण्यातले तुझे हसरे प्रतिबिंब
त्या ढगांहून काळे तुझ्या डोळ्यांतले काजळ
उष्ण-सुगंधी श्वासांमध्ये दडलेले ते वादळ
जोरदार पावसात जरा घेऊन आडोसा
सामावलीस मिठीत माझ्या... सावध... घेऊन कानोसा
त्या मिठीच्या उबेत सारे क्षण ते भिजलेले
घोंघावत्या वाऱ्यात सारे क्षण ते थिजलेले
हिरव्याशार गवतावरची वाऱ्याची मंद सळसळ
सारे क्षण साठवले करून मनाची ओंजळ
पावसाळ्यातल्या भेटी... कधीच विरून त्या गेल्या
मागे राहिल्या फक्त झुलत्या-गळत्या पागोळ्या
तुझ्यासोबतिचा पाऊस नाही कधीच आटला
आज तोच पाऊस माझ्या डोळ्यांत दाटला...
Friday, August 28, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)

great yaar.... i was not aware of this talent of yours.... keep it up !!!
ReplyDelete