Monday, August 31, 2009

नेहमीसारखाच त्या दिवशी मी बाजारात हिंडत होतो
चार-आठ आणे वाचवायला वाद घालत होतो

इतक्यात एका ठेल्यापाशी "ती" मला दिसली
माझ्याकडे पाहून ती ओळख दाखवून हसली

लाल साडी, लाल पर्स, डोळ्यांवर काळा गॉगल
हीच नव्हे का ती कॉलेजमधली माझी "क्यूट गर्ल"!!

रोज लपून छपून आम्ही एकमेकांना पहायचो
मित्रांनी चिडवल्यावर मी चक्क लाजायचो

काहीतरी होईल अशी मला होती खात्री
नकार देईल ती अशी वाटायची पण भीती

कॉलेज पटकन संपले आणी तो प्रसंग टळला
स्वतःचे भविष्य घडवण्याकडे माझा मार्ग वळला

आणी आज अचानक ती पुन्हा माझ्यासमोर आली
अवघडल्यासारखं मी हसताच तिचीही खात्री झाली

"काय रे, कसा आहेस, कसं काय धंदापाणी??
ओळखलास ना मला, मी तर मैत्रीण जुनी...

कॉलेजमध्ये नाही का आपण कित्ती मजा करायचो
एकमेकांना कसं आपण लपूनछ्पून बघायचो..!!!

पण तू कसला भित्रा, मला बोलला नाहीस काही
तुला इंटरेस्ट नसेल म्हणून गप्प राहिले मीहि

परवा तुझा तो मित्र शाम भेटला होता
चौपाटीवर पठ्ठ्या बायकोला फिरवत होता

त्यानेच मला तुझा हा सर्व किस्सा सांगितला
मला तर हे सगळं ऐकून धक्का बसला

गप्प राहिलो नसतो तेव्हा तर बरं झालं असतं
कॉलेज संपल्याबरोबर आपण लग्न केलं असतं

पण अजूनही काही उशीर झाला नाही
तू असशील तयार, तर तयार आहे मीहि..."

अचानक बोलता बोलता ती पट्कन थांबली
माझ्या पाठच्या स्त्रीकडे पाहून परत बोलू लागली

"ही कोण बाई मघापासून इथे उभी आहे?
मी आल्यापासून मला खुन्नस देते आहे..."

मी काही बोलणार तोच स्त्री बोलू लागली "ती"
"तुम्हाला माहित नसेल, पण हे आहेत माझे पती!

तुम्ही असं अचानक भेटला ते बरं झालं,
नाहितर ह्यांच ’हे’ प्रकरण मला कधी कळलंच नसतं..

बरं होईल जर आता निघाल तुम्ही..."
घरी गेल्यावर खैर नाही, म्हणून काळजीत पडलो मी...
तुझ्या डोळ्यांच्या काळ्या डोहात बुडून जावसं वाटतं
तुझ्या डोळ्यातलं स्वप्न हळूचं पहावसं वाटतं

तुझ्या डोळ्यांत अस्मानीच्या नक्षत्रांना बघावसं वाटतं
तुझ्या डोळ्यांत घर करून रहावसं वाटतं

तुझे डोळे पाहतील त्याच रस्त्यावरून जावसं वाटतं
तुझ्या डोळ्यांवर गीत करून ते गावसं वाटतं

तुझ्या डोळ्य़ांच्या एकाच कटाक्षाने घायाळ व्हावसं वाटतं
तुझ्या डोळ्यांवर तन-मन अर्पावसं वाटतं

तुझ्या डोळ्यांतलं तेज दश-दिशांना पसरवावसं वाटतं
तुझ्या डोळ्यांना शीतल चंद्रकिरणांनी सजवावसं वाटतं

तुझ्या डोळ्य़ांतल्या चंचल हास्याला धरावसं वाटतं
तुझे डोळे पाहून तुझ्यावर प्रेम करावंस वाटतं

प्रणयरात्र...

उद्या सकाळपर्यंतच आपला सहवास
त्यानंतर वेगवेगळ्या वाटा,
अलग व्हायचंच आहे
जशा बहरतील पहाटेच्या छटा...

ही रात्रच हाताशी आहे
तेव्हा दवडू नकोस वेळ,
काहि क्षणांतच संपेल
हा अंधाराचा खेळ...

कोण जाणे उद्या कुठे तू
अन कुठे मी?
नशीब कुठवर नेईल
याची कोण देईल हमी!

तेव्हा हीच वेळ आहे
काहीतरी करूया खास,
आजचा हात धरू
सोडून "उद्या"चा ध्यास...

काहीतरी करूया
आठवणीत राहील असं,
काहीतरी करूया
कधी विसरणार नाही असं...

दे हात तुझा
माझ्या हातात हळुवार,
ये जरा मिठीत
वारा सुटलाय गार...

गोंजारू दे तुझे केस
उगाच चाळा लडिवाळ,
न्याहाळू दे तुझा चेहरा
करुन हातांची ओंजळ...

मिसळू दे माझ्या श्वासांमध्ये
उष्ण श्वास तुझे,
विरघळू दे गुलाबी आसमंतात
मंद उसासे तुझे...

सामावून जा माझ्या कवेत
अधरांवर ठेव अधर,
विसरून दुनीयेला साऱ्या
प्रेमाची बरसात कर...

पाहता पाहता सकाळ होईल
मग व्हायचं आहेच वेगळं,
तेव्हा कसं सोडून चालेल
हे क्षणभंगुर सुख सगळं?

उणीव जाणवेल तुझी
तुला सोडून गेल्यावर,
आठवण सतावेल माझी
मी निघून गेल्यावर...

फक्त डोळे बंद कर तेव्हा
ह्रुदयातून तुझ्या येईल आवाज माझा,
कारण सोडुन जरी गेलो तुला
ह्रुदयात तुझ्या असेल ठिकाणा माझा...

चुंबन...

नेहमीसारखे ते दोघे हातांत हात घालून चालत होते
एकमेकांच्या डोळ्यांमधली सुखस्वप्ने पाहत होते

उद्यानाच्या "त्या" जागी ते दोघे येऊन बसले
एकमेकांकडे पाहून अन मग उगाचच ते हसले

त्यांच्यासारख्याच प्रेमवीरांचा तिथे भरला होता दरबार
बाहुपाशांत गुंतले होते सारे... नव्हता जगाशी सरोकार

तिथेच थोडया अंतरावर एक जोडपे होते बसले
त्यांचे चुंबनदृश्य याच्या अधीर डोळ्यांना दिसले

ते पाहून कामदेवाचा बाण बसला याच्या वर्मी
क्षणांत वाढू लागली त्याच्या देहाची गरमी

तिचा चेहरा हलकेच त्याने आपल्या हातांत घेतला
थरथरता आपला ओठ त्याने तिच्या ओठांजवळ नेला

तिच्याही कायेत होती यौवनाची मस्ती
या क्षणी जणू संचारली तिच्या शरीराल रती

त्याच्या आमंत्रणाला तिनेही दिली तशीच दाद
अधरांवर त्याच्या अधर टेकवून दिला गोड प्रतिसाद

क्षणांत झाले दोन नरम, उष्ण ओठांचे मिलन
दहादिशांना झाली जणू सप्तरंगांची उधळण

पुन्हा पुन्हा घेत होता तो त्या कोमल पाकळ्यांची गोडी
तीही मग मागे राहणार होती थोडी?

पाच-दहा मिनिटे त्यांचा हा खेळ चालूच राहिला
गळ्यात गळा घालून आम्ही दोघांनीही तो पाहिला...

नेहमीचंच झालय आता...

नेहमीचंच झालय आता प्रेमात पडणं
जगण्य़ातलं सुख सोडून रोज रोज मरणं

नेहमीचंच झालय आता रात्र रात्र जागणं
कधीतरी एकटाच असताना वेड्यासारखं वागणं

नेहमीचंच झालय आता भावना मनात दाटणं
भावनांच्या पुरात वाहून दूरवर जाणं

नेहमीचंच झालय आता कुठेतरी झुरत बसणं
कोणी सोबत नसलं तरी आठवणींचं साथ असणं

नेहमीचंच झालय आता सर्व साहून गप्प बसणं
थोडा काळ गेला की "ति"ला सगळं सांगणं

नेहमीचंच झालय आता तिचं अवघडल्यासारखं हसणं
सगळं कळूनही काहीच कळतं नाही असं वागणं

नेहमीचंच झालय आता तिच "नाही" म्हणणं
आणि प्रेमात पडून स्वतःचंच हसं करून घेणं

प्रश्न कितीतरी...

मला कळत नाही माझं कुठे काय चुकतं
प्रत्येक छोट्याशा सुखालाही माझं मन का मुकत??

की नियती फक्त माझ्याशीच खेळते हा क्रूर खॆळ??
कधीच होणार नाही का आमच्या दोन मनांचा मेळ??

नशीब नशीब म्हणतो तरी मी कमनशीबी का??
मनातल्या भावनांना मी मनातच कोंडायचे का??

मार्गात प्रत्येक पावलावर का टोचतात मला काटे??
मिळेल प्रेम कधीतरी असे का अनुदिन मज वाटे??

आशेच्या कुबड्या घेऊन आता कुठवर जगायचं??
जवळ येणार्‍या प्रेमाला कितीदा दूर जाताना बघायचं??

दुःखाच्या वाळवंटात येणार नाही का सुखाचा वसंत??
नेहमी कोराच राहणार का मनातला प्रेमग्रंथ??

रात्रभर जागणार्‍या डोळ्य़ांना मिळणार नाही का विश्रांती??
धडपडणार्‍या मनाला कधीच मिळणार नाही शांती??

कधीच थकणार नाही का मी मृगजळामागे पळून??
कधीच बघणार नाही का ती मझ्याकडे वळून??

प्रवासी...

एक प्रवासी चालतच होता तुफ़ानी वादळवार्‍यातून
एक प्रवासी चालतच होता मुसळधार पाऊसपाण्य़ातून

संकटांचे उत्तुंग पर्वत त्याला अडवू नाही शकले
मैलो न मैल चालूनही त्याचे पाय नव्हते थकले

निराशेचे काळॆ ढग त्याने दूर सारले
न्यूनगंडाच्या असुरांना जिद्दीने मारले

दुःखाचे मरुद्यान त्याने सहज पार केले
प्रेमाच्या सुखद झुळकेला त्याने स्वतःबरोबर नेले

लोभाच्या दलदलीत त्याचे पाय नाही रुतले
आशेच्या व्रुक्षांना त्याने खतपाणी घातले

चालतच होता तो जरी काटे त्याला टोचले
उभारी देतच होता मनाला जरी मन होते खचले