Sunday, December 5, 2010

ही शाळा आमुची

ही शाळा आमुची अभिमानाचा एक सोहळा,
या मातीमधल्या जल्लोषाचा गंध आगळा...
हा स्पर्श खडूचा घेऊन येतो आठवणींच्या सरी
ही शाळेमधली घंटा  अजूनी निनादते आमुच्या अंतरी
गुणवंतांची शाळा, यशवंतांची नगरी
जय राजा शिवाजी, जय राजा शिवाजी...!!!

या बाकानवरती स्पर्धा केली अनाम वाऱ्यांनी,
अन यश-शिखरांचे  किल्ले काबीज केले साऱ्यांनी...
ती गुरुशिकवणी गुरुवाणी कोरून काळजात, 
"निर्भीड लढा दे स्पर्धेशी, कर संकटावरी मात..."

"जा सामोरे वादळास, उत्तुंग पायरी चढा,
या यशोन्नती क्षितीजात मोकळ्या निळ्या आभाळी उडा..."
या शाळेने उघडून दिली गुरुकिल्ली यशाची,
जय राजा शिवाजी, जय राजा शिवाजी...!!!

येथेच घडवली शाळेने यशसुमनांची गाथा,
हा प्रणाम आमुचा लाख लाखदा तुम्हास हो गुरुनाथा...
तुमच्याच घडीने शिकलो आम्ही जगण्याची रीत,
मायेचा अलगद एक धपाटा स्मरे अजून पाठीत... 

जो दिला मंत्र तुम्ही आम्हा, अजूनही गुंजतो नित्य कानी,
अन भाग्यशाली जाहलो, लाभता मंगल तव गुरुवाणी...
ही प्रचंड इच्छाशक्ती आम्हा सदा देत असे साथ,
'आयुष्याचे व्हावे राजे', हे ध्येय असे आत...
आमुच्याशी स्पर्धा करण्याची आहे हिम्मत कुणाची...???
जय राजा शिवाजी, जय राजा शिवाजी...!!!

ही शाळा आमुची अभिमानाचा एक सोहळा,
या मातीमधल्या जल्लोषाचा गंध आगळा...
हा स्पर्श खडूचा घेऊन येतो आठवणींच्या सरी
ही शाळेमधली घंटा  अजूनी निनादते आमुच्या अंतरी
गुणवंतांची शाळा, यशवंतांची नगरी
जय राजा शिवाजी, जय राजा शिवाजी...!!!

1 comment: