Saturday, September 19, 2009

प्रेम म्हणजे...

प्रेम म्हणजे काय असतं ते तुम्ही मला विचारा
वेड लागलेल्या मनाचा हा खेळ आहे सारा

नजरेला नजर मिळते, चेहरा हृदयात सामावतो
प्रेमात शहाणा माणूसही आपली बुद्धी गमावतो

रात्रंदिवस सतावत राहते मग तिचीच आठवण
तिच्या एका झलकेसाठी आतुर होते मन

तिच्याच विचारांमध्ये हरखून मरते तहानभूख
प्रेम कराणार्‍यांपासून दूर पळते सुख

उघड्या डोळ्यांनीही आपण स्वप्ने पाहू लागतो
तिच्याच स्मृतींना जवळ करून आपण राहू लागतो

यातून बाहेर पडायचं तर पडताही येतं नाही
तिला समोर घेउन सगळं सांगताही येतं नाही

तिच्याशिवाय आपले जीवनचक्र अडून पडते
हसत हसत नकळतंच आपले मन रडते

खुपकाही करून बसतो आपण प्रेमासाठी
तरीही तिचा नकार लिहिला जातो आपल्या माथी

हृदयाचे मग होऊन जातात शेकडो तुकडे
जीवनाचे सरळ रस्तेही होतात वेडे-वाकडे

प्रेमात वाट्याला येतो शेवटी प्रेमभंग
नकोसे वाटू लागतात सातही रंग

प्रेम म्हणजे आहे वाळवंटातले मृगजळ
प्रेम आहे खोल दरी जिचा दिसत नाही तळ
म्हणून कधी करू नये प्रेमाला जवळ
नाहीतर जीवनात येतेच दुःखांचे वादळ

नुकतेच कुठे...

नुकतेच कुठे येऊन गेले होते मोठे वादळ
नुकतीच कुठे स्थिरावली होती हवेतली धूळ

नुकताच कुठे टाकला होता सुटकेचा निश्वास
नुकताच कुठे लागला होता भविष्याचा ध्यास

नुकतेच कुठे आले होते होठांवरती हसू
नुकताच कुठे लागला होता आशेचा सुर्य दिसू

नुकतेच कुठे उभारले होते विश्व पुन्हा सगळे
नुकतेच कुठे बहरत होते ऋतू आगळे-वेगळे

नुकतेच कुठे मनाला वाटू लागले होते बरे
नुकतेच पुन्हा वाहू लागले सोसाट्याचे वारे

आता कळेल तुला...

आता कळेल तुला, की मन मोडल्यावर कसं वाटतं
आता कळेल तुला, की नातं तोडल्यावर कसं वाटतं

स्वप्नांवर सत्याचा दगड पडला, की ते कसे खळकन फुटून जातात
मनात वाहणार्‍या भावनांच्या नद्या कशा झटकन आटून जातात

अश्रूंचा पूर पापण्यांचा बांध तोडून कसा वाहतो
अशावेळी धीरही कसा आपली साथ सोडून जातो

जीवनभर वैफल्य का माथी लिहीलं जातं
आकांक्षांना पूर्ण होताना स्वप्नांतचं का पाहीलं जातं

भर पावसांतही मनं का जळत असतं
वेड्या आशेमगे मनं का पळत असतं

डोळ्यांत पाणी असलं तरी का मनात असतो अंगार
उध्वस्त, उधळत्या विचारांवर का मन होते स्वार

दुनियेभरची दुःखं झोळीत टाकून माणसं कशी होतात वेगळी
दैव कशी खेळतो भावनांशी खेळी

मनात खोलवर जाऊन कसा रुतून बसतो सल
आयुष्यभर कसा साचून राहतो आपल्याभोवती दुःखांचा चिखल
उधाणलेलं मन
करील किती जतन
समजाऊ कसं पण... आता माझ्याकडेच राहायचं

क्षुब्ध, अशांत आत्मा
मागी सर्वांचा खात्मा
का करील तो तमा... कसं जगात वागायचं

सुन्न झालेली मती
वाटे आपुलकीची भीती
सांगू मी किती... नाही भावनेत वाहायचं

अधीर माझे डोळे
झाले कडांतून ओले
आसवांतून ते बोले... कधीतरी परतूनी यायचं